शहाणी सकाळ अन वेडी रात्र !
चला जरा शांत बसा , विचार करा , रात्र म्हणते !
झोपण्यापेक्षा हातपाय हलवा , व्यायाम करा , सकाळ म्हणते !
झोपण्यापेक्षा मालकंस ऐकत ग्रेस वाचा , रात्र म्हणते !
पुस्तक दिसता निट दुमडून जागेवर ठेवावं , सकाळ म्हणते !
पुस्तक दिसता , पाय दुमडून , वाचत पडावं , रात्र म्हणते !
दारावरचा धोबी , बागेतला माळी , मंडईतून भाजी , सकाळ म्हणते !
सिनेमाची गाणी , प्रवासाचं प्लानिंग , वेफर्सचं पाकीट , रात्र म्हणते !
................वृत्त बदल ………………
रात्री हरवलेली ऑफिसची डायरी कितीही शोधली तरी सकाळीच सापडते !
दिवसभर ऐकलेल्या रेहमानच्या गाण्याची अवघड कॉर्ड रात्रीच सापडते !
नकोनकोशी 'शहाणी सकाळ' येणार्या रात्रीचा 'मेंदू' असते !
हवीहवीशी 'वेडी रात्र' येणार्या दिवसाचं हृदय असते !
- हर्षद
(संगीता मेहेंदळे यांच्या कल्पनेपासून)