चिखलात हात बरबटले , रात्र सरली पण, धुतले जाईना जरासे ,
पाय बेडीत अडकले, कातडी सुलाटली पण, सुटता सुटेना जरासे ,
मनात आहे डोंगरमाथा , वाट पकडली सागराची ,
सांगा किती मैल चाललो तर , जवळ जाईन जरासे ? / १ /
तरी म्हणालो होतो , का पाठवता चक्रव्युहात , केला अभिमन्यु माझा .
पण गोष्ट अभिमन्यूची ऐकली नव्हती अभिमन्यूने , जी ऐकली मी बालपणीच ,
आता फोडले मी चक्रव्यूह , विचारले द्रोणांना ,
सोडता स्वर्गात एकटा कि येता सोबत जरासे ? / २ /
नेहमी ऐकतो गोष्ट गरुडाच्या पिलाची , कशी घेतली पहिली भरारी ,
हाय! विसरून कि मी तर छावा , निघालो चिकटवावयास पंख जरासे , …………
ऐकवायला हवी होती गोष्ट एखाद्या सिंहाची ,
आता लीलया करतो शिकार दिवसा , अन सराव चाचपडत उडण्याचा रात्री अपरात्री ,
हसू नका , असाही सिंहच आहे मी . नाहीच आले उडता तर करीनच शिकार ,
पण सांगा …. थांबवणार कोण , कसे ह्या सिंहाला ? जर आले अचानक उडता जरासे ? / ३ /
आता हरून जिंकून कंटाळा आला , पाहतो जगून जरासे ,
निघालो लांबून जरी , चाललो दरीतून जरी , सुरुवात उशिरा झाली खरी , पण हरकत नाही .
आता चाललो निदान थेट माथ्याकडे तरी ,
एखादे पाउल जरी पडले पुढे तरी , समाधानी मी , कि गेलो जवळ जरासे , / ४ /
२५ उन्हाळे गेले , ७५ राहिले , फारसे नुकसान नाही झाले , २४ वेळा आमरस खाउन फार काही नाही मिळाले ,
उरलेल्या ७५ मध्ये एक जरी दुष्काळ मिळाला , तरी पुष्कळच उपकार झाले .
भरलेल्या पोटाचा कंटाळा आला, आता उपाशी झोपून पाहतो जरासे , / ५ /
शिकारीच्या वेळी उलटून सांबराने शिंग मारले , तर "कोठे उडी मारू" विचारात नाही छावा आईला ,
चवताळून घुसतील तसे घुसवतो नख्या आणि सुळे , "कुठे मारू शिंग" सांबरानेहि विचारलेले नसते आईला ,
भले दोघेही असतील कितीही आज्ञाधारक इतर वेळी .…………
मी हि म्हणेन एखादे गाणे सुचेल ते , न विचारता वाजवेन वाद्य सुचेल ते ,
होईलच ना एका तरी सांबराची शिकार , येईलच न एकतरी अवघड तान ,
मग म्हणतीलच ना शिकवणारे , शिकला स्वताहून जरासे , / ६ /
मला नाही कंटाळा सरळ वाटेचा , नाही फुकटची ओढ वाकड्या वळणाची ,
नाही आस आत्मचरित्र लिहिण्याची , नाही चटक इतिहास घडवण्याची ,
फक्त वाटते कि या छाव्याने दिवसा केलेल्या शिकारी तुम्ही पहिल्याच आहेत ,
पडावे उपयोगी अनेक रात्री जागवून शिकलेले उडणे जरासे , / ७ /
कशी सांगू व्यथा माझी मी ह्या शहाण्यांना , हि भाषा कळणारा एकतरी वेडा आसपास आहे ?
ह्यांना सांगता , ह्यांचे ऐकता , चुकून जर शहाणा झालो ,
…………………. तर देव म्हणेल , "वाया गेले मी मुद्दाम दिलेले , हे वेडेपण जरासे" / ८ /
हर्षद .