Wednesday, 25 October 2023
बारस
देश विदेशातून ५००० मैल चार्टर विमानातून येऊन,
चामड्याचे जाकीट घातलेल्या, महागड्या विड्या ओढणाऱ्या,
पर्यावरण वादी शास्त्रज्ञांची सभा भरली होती,
म्हणाले, "पृथ्वीला, जीव सृष्टीला वाचवायचंय!"
पृथ्वी म्हणाली माणसाला, "तू थांब रे,
आम्हीं सगळे प्राणी, झाडं, वेली, कीड, कीटक, बुरशी, सूक्ष्मजीव
यांना सोबत घेऊन गेली चार कोटी वर्ष करत असलेलं काम पूर्ण करायचंय !"
तुझं तर अजून बारस पण करायचंय !
लगाम
नैतिकतेच्या, लोकापवादाच्या, धर्माच्या,
कोणत्याच नियमात न बसणाऱ्या पण
निसर्गाला मान्य असलेल्या,
अनर्थ आणि नवीन सृजन
यापैकी कुठेही झुकण्याची क्षमता असलेल्या
एका बेलगाम विचाराच्या आहारी गेलेल्या, मला,
देवाच्या कृपेने अगदी वेळेत लगाम घातला गेला...
मेल्यावर श्रेष्ठ भक्त्याचा पुरस्कार घ्यायला
स्वर्गात देवापुढे उभा राहिलो, म्हणालो,
"सद्सद्विवेकाचा विचार योग्य वेळी देऊन मागे खेचलस,
म्हणून वाचलो !"
एक सणसणीत कानफटात देऊन देव म्हणाला,
" स्वतःला मागे खेचणारा तूच होतास मूर्खा,
मी तर खूप आशेनी तुला ढकलल होतं"
मैफल
पोचलो तेव्हा मारवा सुरू झाला होता
निघालो तेव्हा ही बिहाग सुरूच होता
कितीही आधी गेलो तरी तानपुरा लागलेलाच असतो
कितीही नंतर निघालो तरी ठुमरी चालूच असते
मी मैफिलीतून लवकर निघतो तेव्हा काय गमावतो ?
आणि रेंगाळत थांबतो तेव्हा काय कमावतो ?
तरीही ...प्रत्येक ... जन्माच्या... मैफिलीत... मी... जाणारच !
अनादी अनंत काळापासून सुरू असलेल्या ह्या विश्वाच्या मैफिलीचा
जमेल तितका, पचेल तितका आस्वाद घ्यायला !
Subscribe to:
Posts (Atom)