आकाशात ढग दाटले नव्हते
म्हंजे होते, पण एवढे नाही
वाऱ्याला थंडावा आला नव्हता
म्हंजे होता, पण एवढा नाही
क्षितिजावर लाल रंग झाला नव्हता
म्हणजे होता, पण इतका नाही
एवढ्यात खडाडकन् एक वीज गरजली
समोरचा पिंपळवृक्ष दुभंगून जमिनीला
स्पर्ष करून पुन्हा आकाशात गेली,
आकाश पुन्हा निरभ्र, वाऱ्याची झुळूक तशीच शांत
मी अवाक्, बघत राहिलो
ते झाड क्षणार्धात कुठे गेलं?
फांद्या, पानं, खोड काही काही शिल्लक नाही
ना पाला, ना कचरा, ना अवशेष, सगळं भस्म
मी भांबावून मोकळ्या रानाकडे पहात राहिलो
आता उन्हातूनच पार करायचं हे रान म्हंजे,
आत्ता ठरवत होतो त्या झाडाखाली सावलीला बसायचं
इतक्यात मला बासरीचे सूर ऐकू आले
गुरांच्या गळ्यातल्या घंटा, पायातले पैंजण
कोणीतरी हसल्याचा अन् बासरीचा ... आवाज
या सगळ्या चित्रात काहीतरी विचित्र असल्याचा भास झाला
वीज, आकाश, झाड, बासरी, गवळणी, वारा, पाऊस, ऊन
यात नसायला हवी अशी गोष्ट एकदाची सापडली .....
मी !