1.
बघू तिकडे विरोधाभास
आरसा सांगे मलाच, मनातली आस
माझी बाजू डावी, तीच तुझी आहे उजवी
तरी माझं मत काचकड्याचं, तुझं म्हणणं वाजवी
देवाशप्पथ खरं सांगतो, मी देवाला मानत नाही
अशी आहे प्रचलित म्हण, कुणाला वावगी वाटत नाही
बाबांनी शिकवलं, किती वाजले व्यवस्थित सांग
सांगे तो वेळ बदलत होती, काटे बघत लागेना थांग
इतिहास गणितं सगळ्या सकट, होता की हो भ्रम
मिठी मारायच्या विचारात ह्या क्षणाला मनसोक्त रम
2.
सकाळी मोर नाचून गेला,
स्वर्गीय नर्तक उडाला
दुपारी कडाडून वीजा झाल्या
जंगलभर वारा सुटला
लक्षात राहील, मनात ठसेल
असं बरंच काही घडलं
पण कोरला गेला तो मात्र
..... गुणगुणणारा पक्षी !
3.
वाटली सदाफुली जी
तेच ते ब्रह्मांड होते
मिळून जाई गुच्छ अवचित
पाकळी तरी कवटाळू पाहे
का मिळाली नाही आधी
का न मिळते पुन्ह पुन्हा
हेच पुसतो अन् गमवतो
जे मिळाले स्वर्ग होते
भरवुनी डोक्यात मुंग्या
भावनिक वारूळ रे
झटकुनी ही जळमटे तू
जादू हातातूनि झरे
4.
राधा कृष्ण, राम सीता, शंकर पार्वती, लक्ष्मी नारायण, सरस्वती नदी
मनाच्या रानी फुलले ब्रह्मांड
गाभाऱ्यात एक सदाफुली
आत शोधता विश्व सापडे
रानात गवसली स्वत्वाची खोली
गाभारा मंडप एक झाले
कसले वाळवंट, कसल्या वेली
जागेपणी जिचे स्वप्न दिसले
स्वप्नातले सत्य बनून राहिली
सुंदरतेचे गुपित सुंदर राहिले
गुपिताची सुंदरता गुप्त राहिली
No comments:
Post a Comment