Wednesday, 20 February 2013

अभयारण्यातले प्राणी…!!!

भारतातल्या कुठल्याही गावात मनोरंजनासाठी फार कष्ट घ्यावे लागत नाहित. अम्युझामेंट पार्कची इथे गरजच नाहि, कारण 'भारतीय' असा शिक्का लावलेली प्रत्येक व्यक्ती स्वतहाला नेमून दिलेल्या कामासोबत आजूबाजूच्या शहाण्या लोकांचा मनोरंजन करायचा जोड धंदा करतच असते. … आता म्हणाल मला एकदम काय झालं ? तर मी मद्रास मधल्या एका प्राणी संग्रहालयात गेलो आणि दिवसभर आजूबाजूला जो प्रकार पाहिला, त्यावरून मी वरील विधानं केली आहेत. म्हणजे आपण गेलो पिंजर्यातले प्राणी बघायला, पण धमाल मात्र पिंजर्या बाहेरच्या प्राण्यांनी आणली, असा वाटलं . कारण माझा झू दर्शन पोन्डिचेरी मधून निघालो तेव्हाच सुरु झालं.

५५-५६ माणसांची  एक बस जर ८५ पेक्षा कमी लोकांना नेईल तर तो इथे फ़ाउल धरतात. आणि त्या लोकांनी जर चारशे देशस्थांचा (किंवा चार हजार कोकणस्थांचा ) आवाज केला नाही तर बहुदा पोलिस ती बस जाळतात . ह्या बस मध्ये जर ड्रायव्हर म्हणून काम करायचं असेल तर आधी अलिबाग - मुंबई बोट चालवायचा अनुभव असावा लागतो, आणि कंडक्टर म्हणून यायचा असेल तर कमीत कमी रिंग मास्टर !
आणि संभाषणाच्या बाबतीत तमिळ लोकांनी इतकी सुंदर प्रथा पाडलीये , कि जवाब नही ! हिंदी बोलायच नाही, इंग्रजी धड येत नाही, आणि तमिळ बोलायचा ते महाराष्ट्रातल्या 'माळशिरस' गावातले लोक इंग्रजी बोलतील तसं ! त्यामुळे झालं काय, कि मला उतरायची जागा मला माहित नव्हती, ती दाखवण्याबद्दल शेजारच्या मुलाला मी विचारलं  तेव्हा तो "I know !"  असा म्हणला आणि माझ्या आधीच कुठेतरी उतरून गेला. मी गोंधळून दुसर्याला विचारला तेव्हा तो म्हणाला कि  झू चा स्टोप गेला. आता घ्या, "I know" चा अर्थ "मलाही तिथेच उतरायचं, मी उतरेन तिथेच उतर" असा कसा घेणार ? असो. पत्ता सांगताना दिशाभूल करायचा मक्ता काय फक्त पुणेकरांचा आहे काय?

झू जवळ गेल्यावर माझ्या लक्षात आल कि आई बाबा आणि मुलं अश्या कमीत कमी ७ लोकांच्या कुटुंबासोबत कमीत कमी १५  प्लास्टिक पिशव्या कुरकुरत असतात. आणि त्यात निरनिराळ्या मावश्यांनी केलेलं एकाच चवीचं सांबार वाघाच्या पिंजर्यासमोर जो उग्र वास येतो त्याला उत्तर देत असत .

कुटुंबातल्या प्रत्येकाला वेगळाच प्राणी पाहायचा होता. त्यामुळे सगळे सर्व दिशांना धावत आपल्याला हवा असलेला प्राणी शोधत होते. (आणि ते कुणालाच मिळत नव्हते कारण प्राणी ओळखता येतात कुणाला?)… पण जेव्हा ते मिळायचे तेव्हा सगळ्यात जास्त गम्मत येत होति.

माणूस हा प्राणी ज्या पिंजर्यासमोर जाइल त्यातल्या प्राण्यासारखा का वागतो हो?

म्हणजे माकडासमोर जाऊन वाकुल्या करणे, वाघासमोर जाउन "व्हाउअ" अशी पाचकट  डरकाळी फोडणे, हत्ती समोर जाऊन स्वथचा एक कान हातांनी पकडून सोंड करणे, हरणासमोर जाउन हाताच्या दोन बोटांनी खोटे कान (का शिंग) करून टुणूक टुणूक उद्या मारणे, सापाच्या डबक्याजवळ जाउन "फुस्स्स्स" असा आवाज करणे, आणि सगळ्यात कहर म्हणजे साळिंदराच्या समोर जाउन "चूक चूक" असा आवाज करणे….(कारण साळींदर काय करतं हे कुणालाच माहित नसतं .)
आता ह्यातल्या माकड चेष्टा सोडल्या तर इतर कोणतीही क्रिया माणसाची स्वाभाविक क्रिया नाहि. पण अगदी सगळे तसं कर्तात. ते बघून मला डार्विनचा हेवा वाटला . त्याला उगाचच प्रसिद्धी मिळाली. खरतर आपले पूर्वज माकड आहेत हे समजायला डार्विनची काहीच गरज नव्हति. 

हे अभयारण्य ५० एकर जागेत आहे. एकाही प्राण्याचा पिंजरा एक इंच सुद्धा कमी न होता हे ७ एकरात सुद्धा  बसू शकेल. कारण ४३ एकर जागा लोकांनी बसून खाण्याच्या जागेला दिली आहे. मी तिकीट काढून १५  मिनटा नुसता चाललो तेव्हा प्राणी असलेला पिंजरा पहिल्यांदा लागला. इतका वेळ पिंजर्या बाहेरचे प्राणी पाहाणंच चाललं होत. त्यातही माकडाचे प्रकार सगळ्यात जास्त !

बायकोच्या हाताचा भात होरप्ल्यावर झाडाखाली ताणून देऊन घोरणारा एक हुप्प्या, त्याच्या खांद्यावरून क्रिकेट खेळणारी वानरसेना, आणि त्यावर आवाज काढून इडलीच पीठ कसं भिजवायच, हे कुणाला तरी सांगणारी एक मर्कट 'मादी' ! ( सुधृड तमिळ बाइला 'मादी' म्हणल्याबद्दल सिल्क स्मिता, रागेश्री, आयेशा आलाना फलाणा आणि श्रीदेवी ह्यांची जाहीर माफी)… अशी अनेक कुटुंब त्या बागेत खेळत होति.  माझा डोकच गरगरायला लागलं २ तासात. कुठे ती जंगलातली शांतता आणि कुठे ह्या प्राण्यांच्या डोळ्यावर आणि कानांवर होणारे अत्याचार !!! हे सगळ गेली ४ -५ वर्ष तरी सहन करणारे प्राणी "पिंजर्यात असलो तरी आपण प्राणी आहोत, माणसं नाही" ह्याच समाधान मानत असतिल.

बाहेर आलो तेव्हा सुन्न डोक्यांनी एकच विचार माझ्या मनात आला. आपण आपापसात बोलताना शूर माणसाला वाघाची उपमा देतो, निर्लज्ज माणसाला गेंडा म्हणतो, लबाड माणसाला लांडगा म्हणतो, …….तसं हे प्राणी आपापसात बोलताना कशा स्वभावाच्या प्राण्याला माणसाची  उपमा देत असतील ???



………… बहुदा देतच नसतिल. कारण प्राणी म्हणून जगताना दुसर्या प्राण्याला कठोर आणि घाणेरड्या शब्दांनी मारायला ते प्राणी म्हणजे 'माणसं ' थोडीच आहेत??? !!!

No comments:

Post a Comment