Tuesday, 19 March 2024

किष्किंधा सम्राट !

इ.स. ३००० मधल्या पाठ्य पुस्तकातला लेख.. जवळपास हजार वर्षापूर्वीची गोष्ट मला चीन देशाच्या दक्षिण टोकाला असलेल्या हंपी या पुरातन गावात फिरताना वाचनात आली. या भागात किष्किंधा सम्राट म्हणून ओळखला गेलेल्या एका दयाळू, शूर तसेच बुद्धिमान राजाची गोष्ट महान ऋषी मुनिवर राजमुळी या तपस्वीने लिहिली आहे. महाराज बाहुबली हे अमरेंद्र, राजेंद्र, धर्मेंद्र, शरद चंद्र बाहुबली अशा अनेक विशेषणांनी ओळखले जातात. बाहेरच्या शत्रूंशी सामना करायची वेळ न येता कुटुंब कलहातच शौर्य, बुध्दी आणि आयुष्य पणाला लागलेल्या या महान नायकाने आपल्या भावाचा (की काकाचा की पुतण्याच्या ते लिहिलेली पाने हरवलेली आहेत) नायनाट करून स्वतःच्या आईला (की बायकोला) सोडवून कहर पराक्रम केला. (कहर हा शब्द ४०० वर्षा पूर्वी शब्द कोशात टाकलाय) . आजही ह्या राज्याचे अवशेष एके काळच्या तेलंगण राज्याच्या (आज मलेशिया देशाच्या) उत्खननात सापडलेल्या एका शहरात सापडतात. पुढे वालमिकी, व्यास वगैरे अनेक जणांनी या गोष्टीचे स्वतःच्या भाषेत भाषांतर करताना या बाहुबली ला हनुमान अशी एक अनाकलनीय उपमा देऊन काल्पनिक गोष्टी रचल्या आहेत. पण चीन देशाच्या चिकित्सक लोकांनी त्याला प्रमाण न मानता रजमुळी या मुनिंची कथा अतीपश्चिमात्य डिजिटल मोहोर (या शतकातला जागतिक महत्त्वाचा मान्यता प्राप्त चायनीज प्रदेश, ज्यात ली एक लहानशी स्वातंत्र्य देवता मूर्ती नेस्तनाबूत केल्याबद्दल उगाचच निंदा झाली) उमटवली आहे. तरी इतिहास शिकणाऱ्यांनी याच भागात लिहिल्या गेलेल्या कालिदास, राम, हनुमान, शंकर वगैरे अंधश्रद्धात्मक पात्रांचा उल्लेख परीक्षेत केल्यास त्यांना अदृश्य करण्यात येईल (तसही कुणालाही चीन देशांत अदृश्य करता येतच).

No comments:

Post a Comment